कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) चे माजी चेअरमन स्वर्गीय रवींद्र आपटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी जाऊन गोकुळचे जेष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी आदरांजली वाहिली.या प्रसंगी स्व. आपटे यांची पत्नी श्रीमती पद्मजा आपटे आणि चिरंजीव आदित्य आपटे उपस्थित होते. गोकुळ परिवाराच्या वतीने स्व. आपटे यांच्या स्मृतीस पुष्पांजली अर्पण करण्यात आली.
स्व. रवींद्र आपटे यांनी सहकार तत्त्वांवर आधारित विविध संस्थांची उभारणी करत शेतकरीहितासाठी अविरत कार्य केले. गोकुळला बळकटी देण्यासाठी त्यांनी अनेक दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतले. संचालक विश्वास पाटील आणि स्व. आपटे यांनी तब्बल ३२ वर्षे गोकुळ संचालक मंडळात एकत्र कार्य केले असून संघातील निर्णय प्रक्रियेत आणि शेतकऱ्यांशी संवादात दोघांची सहकार्यपूर्ण भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण होती.या वेळी भावना व्यक्त करताना संचालक विश्वास पाटील म्हणाले,“स्व. आपटे साहेबांनी सहकार क्षेत्रात साधेपणा, पारदर्शकता आणि शेतकरीप्रेमाचा आदर्श ठेवला. गोकुळ मजबूत आणि शेतकरीहिताचे राहावे, यासाठी त्यांनी सदैव प्रयत्न केले. त्यांचे योगदान आणि आदर्श कार्यगौरव सदैव स्मरणात राहील.”गोकुळ परिवाराने स्व. आपटे यांच्या स्मृतीस अभिवादन करत त्यांच्या कार्याचा गौरवपूर्वक उल्लेख केला.

Post a Comment