कोल्हापूर : राजारामपुरी व शाहुपुरी पोलीस ठाणे हद्दीत ज्येष्ठ महिलांना लक्ष्य करून जबरदस्तीने गळ्यातील सोन्याचे दागिने हिसडा मारून चोरी करणाऱ्या दोन संशयितांना गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. योगेश भानुदास पिसाळ (वय ३०) व मयुर रमेश जाधव (वय २५) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून सुमारे २,७५,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
राजारामपुरी व शाहुपुरी परिसरातील घटना उघडकीस २,७५,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त
राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्यादी स्वाती बळवंत कुलकर्णी (वय ८२, रा. टाकाळा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यांनी त्यांचे मनीमंगळसूत्र जबरदस्तीने हिसडा मारून पळवून नेले होते. तसेच शाहुपुरी पोलीस ठाण्यात प्रमोदिनी प्रतापराव हवालदार (वय ७८, रा. रुईकर कॉलनी) यांनीही गळ्यातील सोन्याची चेन हिसडा मारून नेल्याची तक्रार नोंदवली होती. याच हद्दीत एका महिलेकडून सोन्याचा घंटन हिसडा मारण्याचा प्रयत्नही झाला होता.
या गुन्ह्यांचा तपास करत असताना पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत यांना गोपनीय सूत्रांकडून संशयित बावची (ता. वाळवा, जि. सांगली) परिसरातील असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शोध पथकाने दोघांना ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता दोघांनी राजारामपुरीतील एक जबरी चोरी, शाहुपुरीतील एक जबरी चोरी व एक चोरीचा प्रयत्न अशा तिन्ही घटनांची कबुली दिली. त्यानंतर दोघांना राजारामपुरी पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन, हवालदार कृष्णात पाटील, पोलीस कॉस्टेबल संदिप सावंत, विशाल शिरगांवकर, सचिन पाटील, यांसह राजारामपुरी गुन्हे शोध पथकाने सहभाग घेतला.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन करीत आहेत.

Post a Comment