कोल्हापूर | प्रतिनिधी
साळोखे पार्क, भारतनगर परिसरात दारूसाठी पैसे न दिल्याचा राग मनात धरून
मुलानेच स्वतःच्या आईचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.सावित्री अरुण निकम (वय ५३, रा. साळोखे पार्क, भारतनगर, कोल्हापूर) मयत वृद्ध महिलेचे नाव आहे. त्यांचा सावत्र मुलगा विजय अरुण निकम (वय ३५,) याने खून केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विजय निकम याने मयत सावित्री निकम यांच्याकडे दारूसाठी पैसे मागितले होते. मात्र, त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी संतापला. या रागातून त्याने आई सावित्री यांना हातापायाने मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या डोक्यात दगडी खलबत्ता घालून गंभीर जखमी केले. या मारहाणीमुळे सावित्री निकम गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाल्या.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर आप्पासाहेब पवार, राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुशांत चव्हाण, उपनिरीक्षक भरत साळुंखे, सचिन चंदन आणि समीर हीले यांनी घटनास्थळी भेट दिली.
मयत यांची मुलगी रोहिणी जयंत पोर्लेकर यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दाखल केली असून, त्यावरून आरोपी विजय अरुण निकम याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
Post a Comment