बेकायदेशीर गॅस विक्रीवर LCB ची धडक कारवाई : ₹४३,००० किमतीचा मुद्देमाल जप्त illegal gas refilling

कोल्हापूर | नियाज जमादार:
जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कठोर कारवाईचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) आज मोठी कारवाई केली आहे. सदरबाजार परिसरातील पागा गल्ली येथे बेकायदेशीरपणे वाहनांमध्ये गॅस भरण्याचा व्यवसाय करणाऱ्या इसमावर छापा टाकून पोलिसांनी ४३,००० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, LCB चे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना माहिती मिळाली होती की, अफजल दस्तगीर फकीर (वय ४२, रा. घर क्र. ३, ई-वार्ड, पागा गल्ली, सदरबाजार, कोल्हापूर) हा घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा साठा करून वाहनांमध्ये जादा दराने गॅस भरण्याचा बेकायदेशीर व्यवसाय करतो.त्यावरून पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करून सापळा रचण्यात आला. कारवाईदरम्यान अफजल फकीर याच्याकडे भारत गॅस कंपनीच्या ११ भरलेल्या सिलेंडर्स, गॅस भरण्यासाठी लागणारे इलेक्ट्रिक मोटर, रेग्युलेटर, पाईप, तसेच इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा एकूण ४३,००० किमतीचा मुद्देमाल आढळून आला.

अफजल फकीर याने गॅस सिलेंडरमधील गॅसमध्ये छेडछाड करून मानवी जीव धोक्यात आणणारा हा प्रकार केला असल्याने त्याच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अमलदार सचिन पाटील, सतिश सुर्यवंशी, सतिश जंगम, विलास किरोळकर, शुभम संकपाळ, लखनसिंह पाटील यांच्या पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post