पुणे, ता. ३१: दुग्ध व्यवसाय आणि प्रक्रिया उद्योग क्षेत्रासाठी देशातील सर्वात मोठा मेळावा ठरलेला “फीड्स टेक आणि डेअरी इंडस्ट्री एक्स्पो २०२५” चिंचवड, पुणे येथील ऑटो क्लस्टर प्रदर्शन केंद्रात मोठ्या उत्साहात सुरू झाला. तीन दिवस चालणाऱ्या या एक्स्पोमध्ये देशभरातील दुग्ध व्यवसायातील संस्था, शास्त्रज्ञ, संशोधक, तंत्रज्ञ, उद्योजक आणि शेतकरी सहभागी झाले आहेत.
या प्रतिष्ठित एक्स्पोचे उद्घाटन कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) चे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या सोहळ्यास दुग्ध उद्योगातील मान्यवर, बेनिसन मीडियाचे प्रतिनिधी, विविध दूध संघांचे पदाधिकारी, अधिकारी आणि तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी चेअरमन नविद मुश्रीफ यांनी एक्स्पोमधील सर्व स्टालना भेटी देऊन सविस्तर माहिती घेतली.
२०१६ मध्ये सुरू झालेल्या या एक्स्पोने अल्पावधीतच देशातील दुग्ध क्षेत्रात महत्त्वाची ओळख निर्माण केली आहे. येथे पशुखाद्य क्षेत्रातील नव्या संकल्पना, दूध प्रक्रिया तंत्रज्ञान, दूध गुणवता तपासणी उपकरणे तंत्रज्ञान, पॅकेजिंग, थंड साखळी व्यवस्था, ऑटोमेशन, ऊर्जा बचत आणि कचरा पुनर्वापर अशा अनेक विषयांवर माहिती आणि प्रात्यक्षिके सादर केली जात आहेत. या एक्स्पोमध्ये गोकुळ दूध संघ यांनी शेतकऱ्यांसाठी खास स्टॉल उभारला आहे. या स्टॉलमध्ये गोकुळचे संतुलित पशुखाद्य, हर्बल पशुपुरक त्यातील वैज्ञानिक घटक, तसेच चांगल्या पोषणामुळे दूध उत्पादनात होणारी वाढ याबाबत माहिती देण्यात आली. गोकुळच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना जनावरांना योग्य आहार देण्याचे नियोजन, खाद्य निवड आणि व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. गोकुळचा हा स्टॉल शेतकरी व उद्योग प्रतिनिधींच्या आकर्षणाचा विषय ठरला आहे.
उद्घाटनावेळी बोलताना चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, “दुग्ध व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे. शेतकऱ्यांचा विकास साधायचा असेल, तर नव्या तंत्रज्ञानाचा वापर आणि वैज्ञानिक दृष्टी आवश्यक आहे. संशोधन, गुणवत्ता नियंत्रण आणि नवीन प्रयोग व सुधारणा यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवता येईल. गोकुळ दूध संघ नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आला आहे. या एक्स्पोमधील आमचा सहभाग शेतकऱ्यांना वैज्ञानिक पद्धतीने जनावरांचे संगोपन आणि पोषण व्यवस्थापन शिकवण्यासाठी आहे.” या तीन दिवसांच्या एक्स्पोमध्ये विविध तांत्रिक सत्रे, कार्यशाळा आणि चर्चासत्रे आयोजित करण्यात आली आहेत. उद्योग क्षेत्रातील मान्यवर आणि तज्ञ शाश्वत दुग्ध व्यवसाय, ऊर्जा बचत, आधुनिक तंत्रज्ञान आणि गुणवत्तावृद्धी या विषयांवर मार्गदर्शन करत आहेत.
एक्स्पोच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन ज्ञान, बाजारपेठेच्या संधी आणि तंत्रज्ञानाची ओळख मिळत आहे. दुग्ध उद्योग नव्या दिशेने वाटचाल करीत असून, या संमेलनामुळे सहकार क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या विकासाला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.या प्रसंगी पुणे जिल्हा सहकारी दूध संघाचे चेअरमन ॲड.स्वप्निलजी बाळासाहेब ढमढेरे, गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, जाफा फीड्सचे कार्यकारी संचालक डॉ.अमिया नाथ, पारस न्यूट्रिशनचे गणेश शर्मा, बेनिसन मीडियाचे प्राची अरोरा, आनंद गोरड, गोकुळचे डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, पशुखाद्य व्यवस्थापक डॉ.व्ही.डी.पाटील व इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment