पुणे :- वेदश्री तपोवन कार्य समितीसह सहयोगी संस्थांतर्फे श्रीमद् भगवद्गीता जयंती निमित्त तीन दिवसीय गीता जयंती महोत्सव आळंदीत आयोजित करण्यात आला आहे. आळंदी मोशी येथील वेदश्री तपोवन येथे दि. २९, ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर रोजी हा महोत्सव होणार आहे. महोत्सवाचे यजमान पुण्याचे प्रसिद्ध उद्योजक आणि महर्षि वेदव्यास प्रतिष्ठानचे ट्रस्टी श्री अभय सुरेशकुमार भुतडा हे आहेत.
या निमित्ताने गीता परिवारातर्फे पुणे जिल्हा स्तरावर शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन दि. २२ ते २७ नोव्हेंबर २०२५ या काळात केले आहे. विजेत्यांना पारितोषिके महोत्सवातच प्रदान केली जातील.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी दि.२९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता ब्रह्मचारी हनुमान चैतन्य महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. यावेळी श्रीराम जन्मभूमि न्यास अयोध्या चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज उपस्थित राहणार आहेत. तर, सकाळी ११ वाजता उद्घाटन सोहळा असून या कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि आळंदीचे ह.भ.प. डॉ. नारायण महाराज जाधव हे उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी वारकरी साधक सन्मान आणि ह.भ.प. डॉ. यशोधन महाराज साखरे यांचे कीर्तन होणार आहे.
दुसऱ्या दिवशी दि. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता वेदश्री तपोवन द्वितीय चरण निर्माण शुभारंभ पूजन आणि महर्षी वेदव्यास पुरस्कार प्रदान सोहळा होईल. यावेळी कांची कामकोटी जगद्गुरू शंकराचार्य अनंतश्री विजयेंद्र सरस्वती महाराज आणि लोकसभेचे सभापती ओम बिर्ला हे उपस्थित राहणार आहेत. राजस्थान पत्रिका चे मुख्य संपादक गुलाबचंद कोठारी यांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तर, सायंकाळी ह.भ.प. डॉ. मकरंदबुवा रामदासी यांची कीर्तनसेवा होईल.
तिसऱ्या दिवशी दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते ११ श्रीमद्भगवद्गीता पारायण आणि संत श्री ज्ञानेश्वर पुरस्कार प्रदान कार्यक्रम होणार आहे. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते ह.भ.प. शांतिब्रह्म मारुती महाराज कु-हेकर यांना संत श्री ज्ञानेश्वर पुरस्कार आणि सी.एस. रंगराजन यांना स्वामी विवेकानंद पुरस्कार देण्यात येईल. यावेळी गीताधर्म मंडळाचे अध्यक्ष डॉ. मुकुंद दातार उपस्थित राहणार आहेत.
तीन दिवसीय महोत्सवात वेदश्री तपोवन द्वितीय चरण शुभारंभ भूमीपूजन, वेद स्वाहाकार यज्ञ, शालेय विद्यार्थी स्पर्धा, पारितोषिक प्रदान, वारकरी साधक पूजन, पुरस्कार वितरण, हरिकीर्तन, प्रवचन, श्रीमद्भगवद्गीता पारायण आदी उपक्रम होणार आहेत. वेदश्री तपोवन कार्य समितीसह महर्षि वेदव्यास प्रतिष्ठान, संत श्री ज्ञानेश्वर गुरुकुल, गीता परिवार, श्रीकृष्ण सेवा निधी आदी संस्थांनी आयोजन केले आहे. तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महर्षि वेदव्यास प्रतिष्ठानचे ट्रस्टी श्री अभय भुतडा यांनी केले आहे.
Post a Comment