किडनी संबंधित आजाराचे निदान करणारे उपकरण विकसित डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या संशोधकांचे यश Diagnosis of kidney disease Devices developed D. Y. Success of researchers of Patil University

कोल्हापूर –

किडनीशी संबंधित आजारांचे  प्रारंभिक टप्प्यातच अचूक निदान करणारे अत्याधुनिक पोर्टेबल उपकरण  विकसित करण्यात डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकांना यश आले आहे. विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडीसीप्लेनरी स्टडीजच्या, स्टेम सेल अँड रिजनरेटिव्ह मेडिसिन आणि मेडिकल बायोटेक्नॉलॉजी विभागातील प्रा. डॉ. अर्पिता पांडे तिवारी आणि संशोधक विद्यार्थिनी मयुरी घाटगे यांनी अधिष्ठाता प्रा. सी. डी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली  हे संशोधन केले आहे. क्रिएटिनीनचे प्रमाण वाढल्यास ते मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेत बिघाड दर्शवते, त्यामुळे दीर्घकालीन मूत्रपिंड विकार उद्भवतात. हे निदान करणाऱ्या पारंपरिक तपासण्या वेळखाऊ आणि खर्चिक असल्याने संशोधकांनी स्मार्ट आणि पोर्टेबल उपकरण तयार केले आहे. त्यातील बायोसेंसर शरीरातील क्रिएटिनीन या महत्त्वाच्या बायोमार्करचे स्तर अचूकपणे ओळखतो.

याबाबत अधिक माहिती देताना प्रा. डॉ. अर्पिता पांडे तिवारी म्हणाल्या, या बायोसेंसरमध्ये सोने मिश्रित पदार्थाच्या संयुगाचा वापर करण्यात आला आहे. रक्तातील क्रिएटिनीनचे प्रमाण वाढल्यास विद्युत प्रवाहात बदल दिसतो. यामुळे किडनी कार्याचे लवकर आणि अचूक निदान शक्य होते. या उपकरणामुळे घरच्या घरी तपासणी शक्य असून त्यामुळे कमी खर्चात जलद निदान होणार आहे.किडनी विकारामध्ये मधुमेह हे प्रमुख कारण असते. रक्तातील साखर दीर्घकाळ वाढल्याने डायबेटिक नेफ्रोपॅथी निर्माण होऊन मूत्रपिंडाचे नुकसान होते. अशा रुग्णांमध्ये क्रिएटिनीनचे प्रमाण नियमितपणे तपासणे अत्यावश्यक असते. या बायोसेंसरच्या मदतीने मधुमेही रुग्णांना रिअल-टाइम मॉनिटरिंग शक्य होईल, ज्यामुळे किडनीतील सूक्ष्म बदल अगदी प्रारंभिक अवस्थेतच लक्षात येतील. भविष्यात हे उपकरण किडणी संबंधित आजाराच्या निदानासाठी महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


या सर्व संशोधकांचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अधिष्ठाता प्रा. सी. डी. लोखंडे, रिसर्च डायरेक्टर डॉ. पी. एस. पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post