कोल्हापूर : आगामी निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे, विक्री किंवा तस्करी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश मा. पोलीस अधीक्षक श्री. योगेशकुमार गुप्ता यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत.त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांनी अधिकारी व अंमलदारांची स्वतंत्र पथके तयार करून कारवाईचे निर्देश दिले.
गोपनीय माहितीनुसार, ऋषीराज विजय पाटील (वय ३६, रा. सडोली खालसा, ता. करवीर) हा व्यक्ती बेकायदेशीर काडतुसे घेऊन हळदी (ता. करवीर) येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आज (दि. १२ नोव्हेंबर २०२५) कोल्हापूर–राधानगरी रोडवरील हॉटेल गोकुळ येथे सापळा लावून आरोपीला ताब्यात घेतले.त्याच्या झडतीत २० हजार रुपये किंमतीचे २० जीवंत राऊंड आढळून आले. सदर मुद्देमाल जप्त करून आरोपीविरुद्ध करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास करवीर पोलीस ठाणे करीत आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. योगेशकुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, अतिष म्हेत्रे, तसेच पोलीस अंमलदार सुरेश पाटील, प्रविण पाटील, दिपक घोरपडे, सत्यजित तानुगडे, सतिश सुर्यवंशी, राजेंद्र ताटे, सुशिल पाटील आणि सागर चौगले यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment