सांगली : ( प्रतिनिधी - विजय क्षेत्रे )
गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण असल्याने दरवर्षी लाखो चाकरमानी मुंबई, ठाणे परिसरातून गावी परततात. रेल्वे तिकिटांची प्रचंड टंचाई असल्याने अनेकजण एसटीच्या लालपरीवर विसंबून राहतात. यंदा प्रवाशांची मोठी गर्दी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने तब्बल ५ हजार जादा बसेस मुंबईतून कोकणात सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
या मोठ्या नियोजनात सांगली विभागानेही आपला मोलाचा वाटा उचलला असून, २३ ते २६ ऑगस्टदरम्यान २६० बसेस मुंबईला पाठवल्या जाणार आहेत. यामुळे चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.
आगारनिहाय वाटप
सांगली – २८, मिरज – २७, इस्लामपूर – ३०, तासगाव – ३०, विटा – २८, जत – २९, आटपाडी – २२, कवठेमहांकाळ – २६, शिराळा – २१, पलूस – १९.
गेल्या वर्षी गणेशोत्सवात ४३०० जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. यंदा त्यामध्ये ७०० बसांची वाढ करून ५ हजार बसेस सोडल्या जात आहेत. प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी एसटीने बसस्थानक व महामार्गावर अतिरिक्त कर्मचारी आणि दुरुस्ती पथके तैनात करण्याची तयारी केली आहे.
पुणे–सांगलीसाठीही ६० जादा बसेस
मुंबईबरोबरच पुणे परिसरातही सांगलीकरांची मोठी संख्या वास्तव्यास आहे. गणेशोत्सवानिमित्त गावी जाणाऱ्या या प्रवाशांसाठी सांगली विभागाने ६० जादा बसेसचे नियोजन केले आहे. त्यात सांगली आगार – ८, मिरज – ८, विटा – ६, इस्लामपूर – ७, तासगाव – ७, जत – ४, आटपाडी – ४, कवठेमहांकाळ – ६, शिराळा – ६ व पलूस – ४ बसेसचा समावेश आहे.
विभाग नियंत्रकांची माहिती
“मध्यवर्ती कार्यालयाच्या मागणीनुसार गणेशोत्सवासाठी मुंबईतील चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी सांगली विभागातून २६० बसेस दिल्या जात आहेत. तसेच पुण्यातून सांगलीकरांसाठी ६० जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील वाहतुकीवर थोडा ताण येणार असला तरी योग्य नियोजन करून प्रवाशांना गैरसोय होणार नाही.”
– सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, सांगली
Post a Comment